🔴 By | अरविंद जाधव
🟡 सचिन अहिर यांचा प्रवेश तात्काळ उपसभापतीपदाची लॉटरी मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. आधीच ठाकरे गटातील ६ खासदारांनी साथ सोडल्यानंतर आता अहिर यांच्या या निर्णयामुळे हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून ही निवड प्रक्रिया विधान परिषदेतच पार पडणार आहे. उमेदवारीनंतर पुढील एक ते दोन दिवसांत निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महायुतीकडे असलेल्या संख्याबळामुळे ही निवड जवळपास एकतर्फी होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
🟡 सचिन अहिर यांची राजकीय पार्श्वभूमी. मुंबईतील प्रभावी आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते म्हणून सचिन अहिर यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली आणि राज्यात मंत्री म्हणूनही काम केले. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ठाकरे गटात महत्त्वाचे स्थान मिळवले. सचिन अहिर यांची मिल कामगार नेते म्हणून देखील ओळख आहे तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट पक्षात असताना महाराष्ट्रभर संघटन बांधणी केली आहे
सचिन अहीर हे मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. नंतर आदित्य ठाकरे यांना निवडणूक लढवण्यासाठी ही जागा सोडण्यात आली आणि त्यानंतर अहिर यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाचा आदित्य ठाकरे यांच्या उभारणीशी जवळचा संबंध मानला जातो.
🟡 आदित्य ठाकरे यांच्यासाठी वैयक्तिक व राजकीय धक्का?
सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि ‘राईट हँड’ म्हणून ओळखले जात होते. वरळी मतदारसंघात त्यांनी तीन वेळा आमदार राहून मजबूत संघटन उभारले आणि त्यानंतर हीच जागा आदित्य ठाकरे यांना देण्यासाठी सोडली होती. त्याबदल्यात त्यांना विधान परिषदेत स्थान देण्यात आले होते, अशीही राजकीय पार्श्वभूमी आहे.
अशा परिस्थितीत, ज्यांनी स्वतःची विधानसभा जागा सोडून आदित्य ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाला बळ दिले, त्याच नेत्याचा शिंदे गटात जाण्याचा निर्णय हा केवळ पक्षांतर नसून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला थेट आणि वैयक्तिक धक्का मानला जात आहे. यामुळे केवळ त्यांच्या टीममधील एक विश्वासू चेहरा कमी झालेला नाही, तर मुंबईतील संघटनात्मक समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर मतदारसंघातील समीकरणे बदलू शकतात, तसेच पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते.
🟡 ‘आणखी आमदार संपर्कात’ – राजकीय चर्चा तापली
सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून शिंदे गटातील काही नेत्यांकडून मोठे दावे केले जात आहेत. त्यानुसार, ठाकरे गटातील आणखी काही आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. जरी या दाव्यांना अधिकृत पुष्टी मिळालेली नसली तरी, अशा प्रकारच्या चर्चेमुळे राजकीय अनिश्चितता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही परिस्थिती अधिक आव्हानात्मक ठरू शकते. कारण आधीच काही खासदारांनी साथ सोडलेली असताना, आता आमदार स्तरावरही फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाचे मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक देखील आपल्याकडे खेचण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे जर हे दावे खरे ठरले, तर येत्या काळात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात आणि सत्तासमीकरणे आणखी बदलू शकतात.
🟡 महायुतीची ताकद अधिक मजबूत
सचिन अहिर यांच्या प्रवेशामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्या महायुतीला मोठा बळकटीकरण मिळाल्याचे चित्र दिसत आहे. विधान परिषदेत संख्याबळाच्या दृष्टीने महायुतीची स्थिती आणखी मजबूत झाली असून, उपसभापती पदावर त्यांचा दावा अधिक ठोस बनला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, अशा प्रकारच्या रणनीतिक हालचालींमुळे महायुती केवळ सत्तास्थान टिकवून ठेवत नाही, तर आगामी निवडणुकांसाठीही आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर उपसभापती निवडणूक ही केवळ औपचारिकता ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज सचिन आहेर यांचा उपभोग सभापतीपदाचा अर्ज दाखल करताना शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील उपस्थित होते
🟡 उद्धव ठाकरे यांना राजकीय धक्के थांबणार काय? नुकतेच , ६ खासदारांच्या बंड नंतर सचिन अहिर यांचे शिंदे गटात जाणे हे ठाकरे गटासाठी सलग धक्क्यांची मालिका पुढे चालू असल्याचे संकेत देणारे आहे. या घटनेमुळे पक्षातील अंतर्गत एकजूट, नेतृत्वाची ताकद आणि भविष्यातील राजकीय दिशा याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
येत्या काळात आणखी आमदार तसेच मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक किंवा नेते पक्षांतर करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर, या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारण अधिकच चुरशीचे होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवस राज्याच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. एकंदर एकनाथ शिंदे यांच्या सलग ऑपरेशनमुळे केंद्रातील नव्या विस्तारित मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांना बक्षीस दिले जाऊ शकते असेही राजकीय विश्लेषक सांगत आहेत.































