🔴 By | राहुल सरपाते
नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर गुरुवारी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील मुगट येथील माता साहिब गुरुद्वारात हल्ला करण्यात आला. दर्शनासाठी गुरुद्वारातून बाहेर येत असताना हा प्रकार घडला. हल्ल्यात बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून सुरक्षा यंत्रणेने तत्काळ हस्तक्षेप करत हल्लेखोराला ताब्यात घेतले. या घटनेत सुरक्षा कर्मचाऱ्यालाही दुखापत झाल्याचे वृत्त आहे.
🟡 पुण्याच्या जसपाल सिंहला अटक
हल्लेखोराची ओळख ६२ वर्षीय जसपाल सिंह अशी झाली आहे. तो मूळचा पुण्याचा असल्याचे वृत्त आहे. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून तो मुगट येथील गुरुद्वारात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले असून हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.
जसपाल सिंह पूर्वी पुणे न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होता, अशी स्थानिक पातळीवर माहिती दिली जात आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी तपास यंत्रणांकडून अद्याप झालेली नाही. त्यामुळे या बाबतीत अधिकृत तपासातील माहितीची प्रतीक्षा आहे.
🟡 गुरुद्वारात हल्ला झाल्याने नांदेडच्या शीख समाजात नाराजी
मुगट येथील माता साहिब गुरुद्वारा हा बाबा तेजा सिंह मास्टरजी डेरा मुखी यांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. धार्मिक स्थळी राजकीय नेत्यावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने नांदेडच्या शीख समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रवींद्र सिंह बुंगई यांनी या घटनेचा निषेध केला आहे. गुरुद्वारासारख्या पवित्र धार्मिक स्थळी अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
🟡 बादल यांच्या प्रकृतीची पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस
हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी सुखबीर सिंह बादल यांच्या प्रकृतीची दूरध्वनीवरून विचारपूस केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून घटनेमागील कारण, हल्ल्याचे नियोजन आणि सुरक्षा व्यवस्थेतील संभाव्य त्रुटी यांचा तपास सुरू केला आहे.
सुखबीर सिंह बादल यांच्यावर यापूर्वीही अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे नांदेडमधील घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.































