केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: शिंदे गटा ला लॉटरी , ‘ऑपरेशन टायगर’चा प्रभाव
🔴 By | अरविंद जाधव
मुंबई : दिल्लीतील सत्ताकेंद्रात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचाली सुरू असून, महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रावर स्पष्ट परिणाम दिसू लागला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) आता केवळ राज्यापुरता मर्यादित न राहता केंद्रातही आपला प्रभाव वाढवण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. त्यामुळेच आगामी विस्तारात या गटाला किती मंत्रिपदे मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाने केंद्रात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री अशी 3 मंत्रिपदांची मागणी पुढे केली आहे. या मागणीमागे त्यांची वाढती खासदार संख्या, महाराष्ट्रातील सत्ता आणि NDA मधील सक्रिय भूमिका हे प्रमुख घटक असल्याचे मानले जाते. दुसरीकडे, भाजप नेतृत्वाकडून किमान 2 मंत्रिपदे देण्याचा सकारात्मक विचार सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी शिंदे यांची वाढती जवळीक हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. दिल्लीतील राजकीय निर्णय प्रक्रियेत अमित शाह यांचा प्रभाव लक्षात घेता, शिंदे गटाला मिळणाऱ्या मंत्रिपदांवर या सलगीचा परिणाम होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मागील काही महिन्यांत झालेल्या बैठका आणि संवाद यामुळे दोन्ही नेत्यांमधील समन्वय अधिक मजबूत झाल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, राज्यातील चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ हे शिंदे गटाच्या वाढत्या ताकदीचे केंद्रबिंदू मानले जात आहे. या मोहिमेद्वारे विरोधी पक्षातील आमदार-खासदारांना आपल्या गटात सामील करून घेण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जाते. परिणामी, शिंदे गटाची संख्या वाढली असून, त्याचा थेट परिणाम केंद्रातील वाटाघाटींवर होत असल्याचे दिसून येते.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिंदे गटाची मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच केंद्रातील मंत्रिपदांच्या वाटाघाटीत हा गट आता अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. विशेषतः महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणे आणि निवडणुका लक्षात घेता, मोदी सरकारला साठी शिंदे गटाला समाधानकारक वाटा देणे आवश्यक मानले जात आहे.
मात्र, अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे 2 की 3 मंत्रिपदे—याबाबतची अनिश्चितता कायम आहे. तरीही, अमित शहांशी असलेली सलगी, ‘ऑपरेशन टायगर’मुळे वाढलेली ताकद आणि दिल्लीतील सक्रिय लॉबिंग या तिन्ही घटकांच्या जोरावर शिंदे गट आगामी विस्तारात आपली छाप सोडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.































