🟡 जखमी अवस्थेत कॉकपिटचा दरवाजा उघडला; १७४ प्रवाशांच्या बचावात महत्त्वाची भूमिका
🔴 By | सोनल शर्मा
दुबई : दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या एफझेड-१०७३ क्रमांकाच्या विमानात घडलेल्या थरारक घटनेनंतर भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे जगभरातून कौतुक होत आहे. विमानाच्या कॉकपिटमध्ये सहवैमानिकाकडून कथित चाकूहल्ला झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतही कॅप्टन मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांना आत प्रवेश करून परिस्थिती नियंत्रणात आणता आली. या धाडसी कृतीमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे विविध वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
🟡 “खरा नायक” म्हणत नेतन्याहूंकडून कौतुक
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे विशेष कौतुक केले. गंभीर जखमी असूनही त्यांनी परिस्थितीचा सामना केला आणि कॉकपिटचा दरवाजा उघडल्यामुळे प्रवासी व कर्मचाऱ्यांना कथित हल्लेखोराला रोखण्याची संधी मिळाली, असे नेतन्याहू यांनी सांगितले. या कृतीमुळे विमानातील १७४ जणांचे प्राण वाचल्याचे त्यांनी म्हटले. नेतन्याहू यांनी मच्छार यांना “खरा नायक” संबोधत त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या.
🟡 मोदींनी देखील केले कौतुक; “कॅप्टन स्मित मच्छार हे नायक”
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक केले. गंभीर जखमी असूनही इतरांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या धैर्याला मोदी यांनी सलाम केला. त्यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली आणि त्यांच्या कामगिरीचा भारताला अभिमान असल्याचे मोदी यांनी म्हटले. मच्छार यांच्या लवकर प्रकृतीसाठीही त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
🟡 ट्रम्प म्हणाले — “ते एका अर्थाने नायक होते”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना भारतीय वैमानिकाचे कौतुक केले. जखमी अवस्थेतही कॉकपिटचा दरवाजा उघडून मदतीचा मार्ग उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. “एका अर्थाने ते नायक होते”, अशा शब्दांत त्यांनी कॅप्टन मच्छार यांचा उल्लेख केला. ही माहिती आपल्याला नेतन्याहू आणि इतरांकडून मिळाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
🟡 भारतीय दूतावासाकडूनही धाडसाला सलाम
भारताच्या इस्रायलमधील दूतावासाने कॅप्टन मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे. जखमी असूनही अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी संयम, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा दाखवत विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दूतावासाने म्हटले आहे. भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनीही भारतीय वैमानिकाच्या धाडसाला सलाम केला.
🟡 अचानक १४ हजार फूट खाली आले विमान
वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार विमानात १७४ प्रवासी होते. कॉकपिटमध्ये झालेल्या संघर्षानंतर विमान अचानक सुमारे १४ हजार फूट खाली आले. जखमी वैमानिकाने कॉकपिटचा दरवाजा उघडल्यानंतर काही प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी आत प्रवेश करून कथित हल्लेखोराला रोखले. त्यानंतर विमानावरील नियंत्रण मिळवण्यात आले आणि सौदी अरेबियातील तबूक येथे विमानाचे आपत्कालीन उतरणे करण्यात आले.
🟡 सौदी रुग्णालयात उपचार
घटनेनंतर कॅप्टन मच्छार यांना सौदी अरेबियातील तबूक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतीय दूतावास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून सौदी अधिकाऱ्यांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, फ्लायदुबईने या घटनेची पुष्टी केली असून संबंधित अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र कॉकपिटमध्ये नेमके काय घडले आणि या घटनेमागील उद्देश काय होता, याचा तपास अद्याप सुरू आहे. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी घटनेला अंतिम स्वरूप देणे टाळणे महत्त्वाचे आहे.































