🔴 By | पी आर नेटवर्क
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील फ्रिमाँट येथे एनव्हिडिया आणि प्लस एआय या कंपन्यांची चिन्हे असलेले दोन मालवाहू ट्रेलर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ट्रेलरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित महागडी उपकरणे किंवा संगणकीय साधने असतील, असा चोरांचा समज झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ट्रेलर उघडल्यानंतर चोरांच्या हाती महागड्या उपकरणांऐवजी तब्बल ४० हजार पौंड म्हणजेच सुमारे १८ टन वाळू लागली.
ही घटना २४ सप्टेंबरच्या रात्री फ्रिमाँट येथील प्लस एआय कंपनीच्या ठिकाणी घडली. स्वयंचलित वाहन तंत्रज्ञानावर काम करणारी ही कंपनी वाहनांच्या चाचणीसाठी मालवाहू ट्रेलरमध्ये वाळू भरून ठेवते. प्रत्यक्ष माल वाहून नेताना वाहनाच्या वजनावर आणि हालचालींवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी वाळूचा वापर केला जातो.
🟡 नव्हिडियाचे नाव व चिन्ह पाहून चोरांचा अंदाज चुकला
चोरीला गेलेल्या दोन्ही ट्रेलरवर एनव्हिडिया मोठे चिन्ह होते. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील एनव्हिडिया चे महत्त्व लक्षात घेता, या ट्रेलरमध्ये अत्यंत महागडी संगणकीय उपकरणे किंवा इतर मौल्यवान साहित्य असावे, असा चोरांचा अंदाज असण्याची शक्यता आहे.
दोन्ही ट्रेलरमध्ये प्रत्येकी सुमारे २० हजार पौंड वाळू भरण्यात आली होती. म्हणजेच एकूण जवळपास १८ टन वाळू ट्रेलरमध्ये होती. त्यामुळे महागड्या तंत्रज्ञानाच्या अपेक्षेने चोरी केलेल्या ट्रेलरमध्ये प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात वाळू असल्याचे समोर आल्यानंतर चोरांचा मोठाच भ्रमनिरास झाला असावा.
🟡 काही तासांतच ट्रेलरचा लागला शोध
चोरी झाल्यानंतर काही तासांतच दोन्ही ट्रेलर सापडले. प्लस ए आय कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मित्राने नेवार्क परिसरातील कंपनीच्या कार्यालयाजवळ हे दोन्ही ट्रेलर पाहिले. त्याने त्यांचा छायाचित्र काढून कंपनीच्या अधिकाऱ्याला पाठवले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि दोन्ही ट्रेलर पुन्हा ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रेलरची कुलपे तोडण्यात आली होती. चोरांनी आत प्रवेश केल्यानंतर त्यामध्ये अपेक्षित महागडी उपकरणे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले असावे. त्यानंतर दोन्ही ट्रेलर जवळच सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे ट्रेलरमधील वाळूही सुरक्षित राहिली.
🟡 महागड्या तंत्रज्ञानाच्या अपेक्षेने चोरी, हाती मात्र वाळू
एनव्हिडिया आणि प्लस ए आय या कंपन्या स्वयंचलित वाहन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करतात. त्यामुळे ट्रेलरवरील कंपनीचे चिन्ह पाहून चोरांनी आत मोठ्या किमतीची सामग्री असल्याचा अंदाज बांधला असावा. मात्र प्रत्यक्षात त्यांना मिळाले ते केवळ वाहनांच्या चाचणीसाठी वापरले जाणारे वाळूचे वजन.
या घटनेचा तपास फ्रिमाँट पोलिसांकडून सुरू असून अद्याप कोणालाही अटक झाल्याची माहिती नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित वाहन तंत्रज्ञानाशी संबंधित महागड्या उपकरणांकडे वाढलेले लक्ष या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.































