🔴 By | अरविंद जाधव
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज, २ ऑक्टोबर रोजी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाची मुंबईत सुरुवात होण्याची तयारी सुरू झाली आहे. शिवाजी पार्क परिसरात कार्यकर्ते आणि समर्थक जमा होऊ लागल्याचे वृत्त असून, परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आज झालेल्या आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विविध वृत्तांनुसार, दिल्ली पोलिसांनी सुमारे ७०० जणांना ताब्यात घेतले असून, यामध्ये राजकीय नेते, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.
🟡 मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त
मुंबईत आज दुपारी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी शिवाजी पार्क आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा वाढवली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ जवळ आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, दीपके यांना गुरुवारी मरीन ड्राइव्ह परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त सकाळी समोर आले होते. मात्र, आज त्यांच्या संघटनेकडून त्यांच्या ताब्यात घेण्याच्या वृत्तावर आक्षेप घेण्यात आला आहे. या प्रकरणावरूनही मुंबईतील आंदोलनाची पार्श्वभूमी अधिक तापली आहे.
🟡 दिल्लीतील कारवाईनंतर मुंबईकडे लक्ष
दिल्लीमध्ये आज आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता मुंबईतील परिस्थितीकडे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत पोलिसांची परवानगी नसतानाही आंदोलन करण्याची भूमिका संघटनेने घेतल्याने पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत.
🟡 स्थानिक नागरिकांचा विरोध; दीपके यांची ऑटोमधून जनजागृती
शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या कार्यकर्त्यांना स्थानिक नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आंदोलनामुळे परिसरातील शांतता, वाहतूक आणि नागरिकांना होणाऱ्या संभाव्य त्रासाबाबत रहिवाशांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या आंदोलनावरून राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या असून काही नेत्यांकडून दीपके यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दुसरीकडे, आंदोलनाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अभिजीत दीपके यांनी स्वतः ऑटो चालवत मुंबईच्या रस्त्यांवर जनजागृती केली. ‘शिवाजी पार्क’ असा संदेश देत केलेल्या या उपक्रमाचा व्हिडिओ आज समाजमाध्यमांवर चर्चेत आला.































