🔴 By | किसन भवाल
सानो : पावसामुळे केवळ पाच-पाच षटकांचा झालेला भारत आणि जपान यांच्यातील ऐतिहासिक टी-२० सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. जपानने भारताला चांगलीच झुंज दिली; मात्र भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी संयमी गोलंदाजी करत भारताला दोन धावांनी विजय मिळवून दिला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जपानच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही. भारताने पाच षटकांत चार गडी गमावत ३२ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने १२ चेंडूंत १६ धावा करत संघाच्या डावाला आधार दिला, तर संजू सॅमसनने ७ चेंडूंत ९ धावा केल्या.
🟡 जपानची जोरदार झुंज
३३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या जपानने भारतीय संघावर सुरुवातीपासून दबाव निर्माण केला. जपानच्या फलंदाजांनी भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामना करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. कर्णधार केंडेल कडोकावा-फ्लेमिंगने १२ धावा करत संघाच्या धावसंख्येत महत्त्वाची भर घातली.
भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने दोन गडी बाद करत प्रभावी कामगिरी केली. अखेरच्या षटकात जपानला विजयासाठी आठ धावांची गरज होती. अक्षर पटेलने निर्णायक षटक टाकत केवळ पाच धावा दिल्या आणि भारताचा विजय निश्चित केला. जपानचा डाव पाच षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ३० धावांवर थांबला.
🟡 भारत-जपान क्रिकेटमधील ऐतिहासिक सामना
भारत आणि जपान यांच्यातील हा पहिलाच पुरुष आंतरराष्ट्रीय टी-२० सामना होता. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होत असताना झालेल्या या सामन्याला विशेष महत्त्व होते. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा सामना भारतासाठी सरावाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात होता.
मात्र अपेक्षेप्रमाणे सहज विजय मिळवण्याऐवजी भारताला जपानविरुद्ध शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. कमी धावसंख्येच्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अखेर आपला अनुभव पणाला लावत दोन धावांनी सामना आपल्या नावावर केला.
🟡 जपानमध्ये क्रिकेटचा प्रवास
जपानमध्ये क्रिकेटची सुरुवात १८६३ मध्ये ब्रिटिशांच्या माध्यमातून झाली. १८६८ मध्ये योकोहामा क्रिकेट क्लबची स्थापना झाली; मात्र सुरुवातीच्या काळात हा खेळ प्रामुख्याने परदेशी नागरिकांपुरताच मर्यादित राहिला. पुढे १९८०च्या दशकात जपानी नागरिक आणि विद्यापीठांमध्ये क्रिकेटचा प्रसार सुरू झाला. जपान क्रिकेट संघटनेची स्थापना १९८४ मध्ये झाली आणि १९८९ मध्ये जपान आयसीसीचा संलग्न सदस्य बनला. १९९०च्या दशकात विद्यापीठांच्या माध्यमातून क्रिकेटचा विस्तार झाला. १९९६ मध्ये जपानच्या पुरुष संघाने पहिल्यांदा मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला, तर २००५ मध्ये जपानने आयसीसी ईस्ट एशिया-पॅसिफिक क्रिकेट चषक जिंकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महत्त्वाची नोंद केली. त्याच वर्षी जपानला आयसीसीचे सहयोगी सदस्यत्व मिळाले.































