🔴 By | पी आर नेटवर्क
रायगड : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (१ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या खासगी शिकवणी वर्गातील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. समुद्राच्या पाण्याची खोली आणि भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथील विनर्स अकॅडमीमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचा समूह दिवेआगर येथे सहलीसाठी आला होता. या समूहात एकूण ४८ जणांचा समावेश होता. त्यात २५ मुले, १७ मुली आणि ६ शिक्षक होते. विद्यार्थी इयत्ता अकरावी आणि बारावीचे असल्याची माहिती समोर आली आहे. समुद्रकिनारी पोहोचल्यानंतर काही विद्यार्थी पोहण्यासाठी समुद्रात उतरले.
🟡 समुद्रात उतरले आणि अचानक खोल पाण्यात ओढले गेले
पाण्यात उतरलेल्या विद्यार्थ्यांना समुद्राच्या खोलीचा आणि भरतीच्या प्रवाहाचा योग्य अंदाज आला नाही. प्राथमिक माहितीनुसार, एका विद्यार्थ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर विद्यार्थीही खोल पाण्यात ओढले गेले. काही वेळातच आठ विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात बुडाले. दिघी सागरी पोलिसांनीही विद्यार्थ्यांनी भरतीचा अंदाज चुकवल्याची प्राथमिक माहिती दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि स्थानिक जलक्रीडा कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी समुद्रात शोध घेत आठही विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
🟡 मृत विद्यार्थ्यांची नावे
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आठ विद्यार्थ्यांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वाहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य वासनकर, राजवीर युवराज वाहिले, प्रणव रामदास बनसोडे आणि सुमित भारत अहिरे यांचा समावेश आहे.
या दुर्घटनेनंतर दिवेआगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासन आणि पोलिसांकडून घटनेची पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. समुद्राची खोली, भरती-ओहोटी आणि प्रवाहाचा अंदाज नसताना पर्यटकांनी पाण्यात उतरणे टाळणे, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षा सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे या दुर्घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.































