🔴 By | अरविंद जाधव
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना, मुंबईतील शिवसेनेचे नेते आणि माजी उपमहापौर बाबुभाई भवानजी यांनी केलेली एक मागणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि हकालपट्टीची मागणी होत असतानाच, भवानजी यांनी मात्र त्यांना थेट केंद्र सरकारमध्ये मंत्री करण्याची मागणी केली आहे. अश्विनी वैष्णव आणि एस. जयशंकर यांच्याप्रमाणे ज्ञानेश कुमार यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
🟡 विरोधकांकडून हकालपट्टीची मागणी, रस्त्यावर आंदोलन
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील वातावरण गेल्या काही दिवसांत अधिक तीव्र झाले आहे. विशेषतः मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेससह इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची किंवा पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. एप्रिलमध्ये ७३ विरोधी खासदारांनी त्यांच्या विरोधात राज्यसभेत हटविण्याच्या प्रस्तावाची नोटीसही दिली होती, तर सप्टेंबरमध्ये विरोधकांकडून पुन्हा अशाच हालचाली सुरू झाल्या.
३० सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे दिसून आले. मतदार याद्यांमधील बदल, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीतील पारदर्शकता आणि आयोगातील अंतर्गत मतभेद यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने आपले निर्णय कायदेशीर प्रक्रियेनुसार आणि एकमताने घेतले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
🟡 आणि याच वातावरणात आली थेट मंत्री करण्याची मागणी!
याच पार्श्वभूमीवर बाबुभाई भवानजी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या कामाचे समर्थन करत त्यांना केंद्रात मंत्री करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, ज्ञानेश कुमार हे विद्वान आणि अनुभवी प्रशासकीय अधिकारी असून त्यांनी देशहिताशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये भूमिका बजावली आहे.
भवानजी यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची प्रक्रिया, राम जन्मभूमी मंदिराशी संबंधित ट्रस्टची स्थापना व नियमावली तसेच राफेल प्रकरणात सरकारची बाजू तयार करण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ देत या सर्वांमध्ये ज्ञानेश कुमार यांची भूमिका असल्याचा दावा केला आहे. या कामांमुळेच त्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.
🟡 ‘ज्ञानेश कुमार यांना आता लक्ष्य केले जात आहे’
भवानजी यांच्या मते, ज्ञानेश कुमार यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत अनेक कठीण निर्णय आणि नियमावलीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच सध्या त्यांच्यावर राजकीय दबाव आणि टीका होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून त्यांनी आयआयटी कानपूरमध्ये शिक्षण घेतल्याचे आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलशी संबंधित शिक्षण घेतल्याचे भवानजी यांनी नमूद केले. त्यांनी चार्टर्ड अकाउंटन्सीचे शिक्षण घेतल्याचाही दावा केला आहे.
🟡 एकाच व्यक्तीबाबत दोन टोकाच्या भूमिका
विशेष म्हणजे, सध्या ज्ञानेश कुमार यांच्याबाबत देशातील राजकीय वातावरण दोन टोकांवर दिसत आहे. एका बाजूला विरोधक निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा किंवा पदावरून हटविण्याची मागणी करत आहेत; तर दुसऱ्या बाजूला भवानजी त्याच अधिकाऱ्याला केंद्र सरकारमध्ये मंत्री करण्याची मागणी करत आहेत.
त्यामुळे भवानजी यांची ही मागणी राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तपदावर असलेल्या व्यक्तीला थेट केंद्रीय मंत्रिपद देण्याची मागणी ही सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर निश्चितच वेगळी आणि आश्चर्यकारक राजकीय भूमिका म्हणून पाहिली जात आहे. मात्र, ही बाबूभाई भवानजी यांची वैयक्तिक राजकीय भूमिका आहे. सध्या ते महायुती मधील प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात.































