पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरातील घटना; दीर्घकालीन आजारपणामुळे मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती, वाकड पोलिसांकडून तपास सुरू
🔴 By | सचिन धुमाळ
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौक परिसरात आई आणि सहा वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ३३ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये ही घटना घडली. एकता मनोज भांगड आणि तिचा मुलगा माधव अशी मृतांची नावे असल्याचे वृत्त आहे.
🟡 मृत्यूपूर्वी लिहिली आठ पानी चिठ्ठी
या घटनेनंतर पोलिसांना महिलेने लिहिलेली सात ते आठ पानांची चिठ्ठी मिळाली आहे. या चिठ्ठीत तिने आपल्या पतीबद्दल भावना व्यक्त करत, आपल्या पश्चात त्यांनी पुनर्विवाह करून नव्याने आयुष्य सुरू करावे, अशी विनंती केल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे. मुलाच्या भविष्याबाबत आणि आपल्या अनुपस्थितीत त्याला आईची आठवण येत राहील, या विचारांचाही चिठ्ठीत उल्लेख असल्याचे समजते. या चिठ्ठीतील मजकुराची पोलीस पडताळणी करत आहेत.
🟡 दीर्घकालीन आजारपणामुळे तणावात असल्याची प्राथमिक माहिती
प्राथमिक पोलीस माहितीनुसार, संबंधित महिला गेल्या अनेक वर्षांपासून पाठीच्या मणक्याच्या आजाराने त्रस्त होती. विविध रुग्णालयांमध्ये उपचार करूनही अपेक्षित सुधारणा होत नसल्याने ती मानसिक तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि इतर संभाव्य कारणांचा तपास अद्याप सुरू आहे.
🟡 सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून, त्यामध्ये महिला आपल्या मुलासह लिफ्टने इमारतीच्या १८ व्या मजल्यावर जाताना दिसल्याचे वृत्त आहे. घटनास्थळाचा पंचनामा आणि फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका कुटुंबावर कोसळलेल्या या दुर्दैवी संकटाने परिसरातील नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे.































