🔴 By | पी आर नेटवर्क
नवी दिल्ली: केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनादरम्यान बळजबरीने ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना वाहनात ढकलून आसनावर दाबून ठेवल्याने श्वास घेण्यास त्रास झाल्याचे ब्रिटास यांनी सांगितले. सुटका झाल्यानंतर ते रस्त्याच्या कडेला बसून राहिल्याचे वृत्त आहे.
ब्रिटास यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले होते. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांनी त्यांना बळजबरीने वाहनात नेले. आपण राज्यसभेचे खासदार असल्याचे सांगून तसेच ओळखपत्र दाखवूनही पोलिसांनी आपल्याला सोडले नाही, असा दावा त्यांनी केला.
पाच सीआरपीएफ जवानांनी आपल्याला आणि अन्य एका व्यक्तीला वाहनातील आसनावर दाबून ठेवल्याचा आरोप ब्रिटास यांनी केला. पोलिसांच्या अंगावरील कॅमेऱ्यातून हा प्रकार नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर डीसीपी सचिन यांच्या हस्तक्षेपामुळे आपली सुटका करण्यात आली, असे ब्रिटास यांनी सांगितले.































