🔴 By | अरविंद जाधव
दुष्काळ निवारणासाठी ४५ हजार कोटींची प्राथमिक गरज, उद्योजक व व्यापारी यांच्या पुढाकाराची गरज
मुंबई : महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, पशुधन आणि सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी उद्योग व व्यापार क्षेत्रासह समाजातील विविध घटकांनी पुढे यावे, असे आवाहन मुंबईचे माजी उपमहापौर आणि शिवसेना मुंबई गुजराती सेलचे अध्यक्ष बाबूभाई भवानजी यांनी केले आहे.
राज्यातील काही भागांत पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हा अन्नदाता असून संकटाच्या काळात त्यांना मदतीचा हात देणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे यंदाचे सण आणि उत्सव शक्य तितक्या साधेपणाने साजरे करून त्यातून वाचणारा निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरावा, असे भवानजी यांनी म्हटले आहे.
🟡 राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त
महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. यामध्ये मराठवाड्यातील ७४ तालुक्यांचा समावेश आहे. या भागातील शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण नागरिकांना दुष्काळाचा मोठा फटका बसला असून मदतीची आवश्यकता असल्याचे भावनजी यांनी सांगितले.
दरम्यान, ६ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील एकूण १ कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ६५ लाख २६ हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. सुमारे ६० लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंदणी झाली आहे. मात्र, ६५.२६ लाख हेक्टर हा अंतिम नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा नसून आतापर्यंत पूर्ण झालेल्या पंचनाम्यांचे क्षेत्र आहे. उर्वरित पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
🟡 दुष्काळ निवारणासाठी ४५ हजार कोटींची गरज
दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्याला प्राथमिक स्वरूपात सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची आवश्यकता भासू शकते, असा अंदाज राज्याच्या अर्थ विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर केंद्राकडे किती मदत मागायची आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती आर्थिक मदत द्यायची, याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनालाही नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे भवानजी यांनी म्हटले आहे. सण-उत्सवांवरील अनावश्यक खर्च टाळून त्यातील काही निधी दुष्काळग्रस्त शेतकरी, पशुधन आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, बाबूभाई भवानजी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक लवकरच विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांचा पाहणी दौरा करणार आहे. या दौऱ्यात स्थानिक परिस्थिती, शेतकरी व पशुधनासमोरील अडचणी आणि आवश्यक मदतीचा आढावा घेतला जाणार आहे.
पाहणीनंतर उद्योग, व्यापार आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच संस्थांशी संपर्क साधून दुष्काळग्रस्तांसाठी मदत उभी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. शेतकरी आणि दुष्काळग्रस्त नागरिकांना शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे बाबूभाई भवानजी यांनी सांगितले.































