दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबई विमानातील भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर सह-पायलटने केलेल्या कथित हल्ल्याच्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओमानमधील वरिष्ठ सरकारी सूत्रांनी एनडीटीव्ही ला दिलेल्या माहितीनुसार, या सह-पायलटच्या अतिरेकी संकेतस्थळे आणि दहशतवादाशी संबंधित मजकुरातील स्वारस्याची माहिती विमान क्षेत्रात त्याच्या प्रशिक्षणाच्या काळातच सुरक्षा यंत्रणांच्या निदर्शनास आली होती.
एनडीटीव्ही वृत्तानुसार, हमाम अल-हम्मामी हा ओमानचा नागरिक असल्याचे अनेक माध्यमांनी म्हटले आहे. मात्र, त्याची ओळख संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी किंवा फ्लायदुबईने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. ओमानच्या सूत्रांनी सांगितले की, त्याने आयुष्याचा बराच काळ ओमानबाहेर, त्यात संयुक्त अरब अमिराती आणि सीरियामध्ये घालवला होता.
🟡 विमान प्रशिक्षणादरम्यानच सुरक्षा यंत्रणांचे लक्ष
ओमानच्या वरिष्ठ सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अल-हम्मामीने एका टप्प्यावर ओमानमधील विमान कंपनीकडे मर्यादित काळासाठी प्रशिक्षण घेतले होते. याच काळात त्याच्या इंटरनेटवरील हालचालींवर लक्ष ठेवताना अतिरेकी विचारसरणीशी संबंधित संकेतस्थळे आणि दहशतवादाशी संबंधित सामग्रीबाबत त्याची उत्सुकता आढळून आली.
या पार्श्वभूमीवर त्याला ओमानमध्ये विमान वाहतूक क्षेत्रात पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही, असा दावा सूत्रांनी एनडीटीव्हीसी बोलताना केला आहे. याआधीही त्याच्या वैचारिक भूमिकेबाबत चिंता व्यक्त झाल्याचे काही अहवाल समोर आले होते.
🟡 मग दुसऱ्या ठिकाणी नोकरी कशी मिळाली?
सर्वात गंभीर प्रश्न यानंतर निर्माण होतो. ओमानच्या सूत्रांचा दावा आहे की, त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी नोकरी देण्यापूर्वी ओमानकडून सुरक्षा पडताळणी करण्यात आली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
सूत्रांनी एनडीटीव्ही ला सांगितले की, ओमानकडे औपचारिकरीत्या माहिती मागवण्यात आली असती तर उपलब्ध असलेली सर्व माहिती संबंधित पक्षांना देण्यात आली असती. या प्रकरणात “कुठेतरी मोठी चूक झाली”, असेही ओमानच्या सूत्रांनी म्हटले आहे. त्यात निष्काळजीपणा, देखरेखीतील त्रुटी किंवा जाणूनबुजून दुर्लक्ष यापैकी काही बाबींचा समावेश असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
🟡 पूर्वीच अनेक देशांनी हा जिहादी हल्ला मानला आहे
दरम्यान, फ्लायदुबई विमानातील या घटनेला इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी दहशतवादी कृत्याचा प्रयत्न मानले आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडियन सार यांनी एनडीटीव्ही ला बोलताना या हल्ल्याला ‘जिहादी दहशतवादी हल्ला’ असे संबोधले होते; मात्र त्यावेळीही तपास पूर्ण झालेला नसल्याचे आणि कोणामागे नेमके कोण होते, याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
या घटनेत भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांनी जखमी अवस्थेत कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर प्रवाशांनी सह-पायलटला काबूत घेतले आणि विमानातील अन्य दोन पायलटांनी सौदी अरेबियातील तबूक येथे विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. या घटनेमागील संपूर्ण कट, सह-पायलटची पार्श्वभूमी आणि सुरक्षा पडताळणीतील संभाव्य त्रुटींचा तपास आता अधिक महत्त्वाचा ठरत आहे.































