🔴 By | सचिन धुमाळ
पुणे : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच थेट पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मनासारखी बदली न झाल्याच्या नाराजीतून पोलीस कर्मचारी अमोल भिसे याने चारचाकी गाडीने पोलीस आयुक्तांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला धडक दिल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
🟡 बदली न मिळाल्याने थेट आयुक्तांचा बंगला गाठला
मंगळवारी (३ नोव्हेंबर) सायंकाळी सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अमोल भिसे हा पुणे पोलीस मुख्यालयाशी संलग्न होता. पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांमध्ये त्याला अपेक्षित पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली नसल्याने तो नाराज होता. याच नाराजीतून त्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कॅन्टोन्मेंट परिसरातील शासकीय निवासस्थानाकडे धाव घेतली. तेथे पोहोचल्यानंतर त्याने कार थेट बंगल्याच्या मुख्य गेटला धडकवली.
🟡 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
या घटनेवेळी बंगल्याच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी तैनात होते. भिसे याने त्यांच्या दिशेनेही गाडी नेल्याचा आरोप आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. संबंधित कर्मचारी मद्याच्या प्रभावाखाली असल्याचेही प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🟡 यापूर्वीही झाले होते निलंबन
या घटनेची माहिती देताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित कर्मचाऱ्याला यापूर्वी २०२५ मध्ये निलंबित करण्यात आले होते आणि २०२६ मध्ये पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते, असे सांगितले. त्याच्या विरोधात यापूर्वीही शिस्तभंगाच्या तक्रारी आणि काही गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्याच्या घटनेनंतरही त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
🟡 ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी
ताब्यात घेतल्यानंतर अमोल भिसे याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात सुरक्षा कर्मचाऱ्यांना गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमांनुसार, त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलीस दलात बदली आणि नियुक्तीच्या कारणावरून नाराजी असू शकते; मात्र त्यातून थेट पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर कार घालण्यापर्यंत मजल गेल्याने पुणे पोलीस दलातील शिस्तीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.






























