अर्चिता मांडले | मुंबई
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याचा मेळाव्यात ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ या नव्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करत राज्याच्या विकासाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या सभेची आठवण करून देत त्यांनी पुन्हा एकदा सर्वसमावेशक विकास आराखडा सादर करण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज ठाकरे यांनी 2014 मध्ये सादर केलेल्या विकास आराखड्याचा उल्लेख करत माध्यमांवरही टीका केली. 2008 ते 2014 दरम्यान सतत आराखड्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनी तो प्रसिद्ध झाल्यानंतर वाचण्याचाही प्रयत्न केला नाही, असा आरोप त्यांनी केला. तसेच सत्ताधाऱ्यांनीही त्यातून कोणताही धडा घेतला नसल्याचे ते म्हणाले.
राज्यातील सध्याच्या विकासाच्या संकल्पनेवर टीका करत त्यांनी म्हटले की, ‘विकास’ म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल उभारणे एवढ्यावरच मर्यादित राहिला आहे. हजारो कोटींच्या प्रकल्पांची घोषणा आणि उद्घाटन यातच सरकार समाधान मानत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच विविध सरकारी योजनांद्वारे नागरिकांना ‘फ्री बीज’ देण्याच्या प्रवृत्तीवरही त्यांनी निशाणा साधला. नागरिकांना मोफत सुविधा नव्हे, तर चांगल्या दर्जाचे जीवनमान हवे असते, ही मूलभूत गोष्ट सरकार विसरल्याची टीका त्यांनी केली. 2026–27 च्या अर्थसंकल्पात राज्यावर सुमारे ₹11 लाख कोटींचे कर्ज असल्याची कबुली देण्यात आल्याचे त्यांनी नमूद करत यामागे नियोजनाचा अभाव कारणीभूत असल्याचे सांगितले.
या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र नेक्स्ट’च्या माध्यमातून नव्या विकास आराखड्याची घोषणा करताना त्यांनी यावेळी जनतेच्या सहभागावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांच्या कल्पना आणि तज्ज्ञांच्या मतांचा समन्वय साधून एक सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार लोकांचे ऐकण्याची क्षमता गमावत असल्याचा आरोप करत, ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हे व्यासपीठ नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवेल, असेही त्यांनी आश्वासन दिले. नागरिकांनी वेबसाईटवर जाऊन विविध विषयांवर आपले मत नोंदवावे, असे आवाहन त्यांनी केले.





























